तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केल्याने मोठी हाणी टळली
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड शहरातील मोहमिदया कॉलनी येथे विद्युत तार तुटून घरावर पडल्याने स्पार्किंगच्या ठिणग्या उडून चार घरांना आग लागली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केल्याने मुळे मोठी हाणी टळली. मात्र यातील एका घरातील रोख रक्कम, दागिने व आदि साहित्य जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर घटनेची माहिती समझताच महावितरण कंपनीचे अभियंता उमेश कसबे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याबाबत माहिती अशी की, तेलगाव रस्त्यावरील मोहम्मदीया कॉलनी येथून 33 के.व्ही. केंद्राची वीज वाहिनी गेलेली आहे. गुरु वारी ( दि 3) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास स्पार्किंग होऊन तार तुटून घरांवर पडली. अचानक दिवाळीच्या फटाक्यासारखा आवाज झाला. तार पडली तेव्हा विद्युत प्रवाह सुरू होता. घरांवर पत्रे असल्याने तार पडताच स्पार्किंग होउन आगीच्या मोठ्या ठिणग्या उडून शेख आमेर, शेख हबीब, महेबुब बेग, शेरखान या चार जणांच्या घरांना आग लागली.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ फोन करून विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सांगितले. वीज पुरवठा बंद होताच घरातील पाण्याने आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही शेख आमेर यांच्या घराला आगीचा विळखा पडल्याने घरातील कपाट, त्यातील रोख 35 हजार रूपए, दागिने, पलंग, शोकेस आदी साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तर इतरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उन्हाळा सुरू झाला असून, या दरम्यान आगीच्या घटना घडत असतात. नागरिकांनी अधिक जागरूक रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
एमआयएम ने घेतली धाव
सदर घटनेची माहिती समजताच एमआयएम चे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी सय्यद इलियास सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान महावितरणच्या अधिका-यांनी पंचनामा केला. या घटनेत किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.