महावितरणच्या उप-व्यवस्थापकास कारणे दाखवा नोटीस, दंडात्मक कारवाई ची टांगती तलवार
By MahaTimes ऑनलाइन – लातूर |
मयत वीज कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा धर्तीवर नोकरी देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास नऊ वर्षाचा विलंब झाल्याची अनियमिततेची बाब निदर्शनास येताच लातूर विभागातील मानव संसाधन विभागाचे उप-व्यवस्थापक उत्तम निवृत्तीराव रायपल्ले यांना महावितरण प्रशासनाने सेवाविनिमय 2005 मधील तरतुदीनुसार मार्च 2022 च्या वेतनात दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये. अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस महावितरणचे संचालक डॉ. नरेश गित्ते यांनी बजावली आहे.

महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. नरेश गित्ते यांनी मानव संसाधनाच्या कामास गती देण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मराठवाडयातील मानव संसाधन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन प्रलंबित शिस्तभंगाची प्रकरणे, अपिल प्रकरणे, निलंबनानंतरची पुढील कार्यवाही, पदोन्नती पॅनेल, अनुकंपा तत्वावरील नोकरीची प्रकरणे, बिंदूनामावली निश्चितीकरण आदी विषया संबंधीची बैठक घेत ती तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, सोमवारी (28 फेब्रुवारी) महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. नरेश गित्ते लातूर दौऱ्यावर आले होते. अभियंत्याच्या वीजबिल वसूली कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी लातूर विभागाच्या मानव संसाधन विभागास अचानक भेट दिली. त्यावेळी दफतर तपासणीत त्यांना कै. विज्ञान मारोती कांबळे व कै. सुलेमान रुस्तुम शेख या मयत वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांची अनुकंपा नोकरीचे प्रलंबित प्रस्ताव आढळून आले. ते प्रस्ताव मागील नऊ वर्षापासून लातूर विभागीय कार्यालयातच पडून होते. पुढील कार्यवाहीसाठी ते वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास विलंब झाल्याची बाब संचालकांच्या निर्दशनास आल्याने त्याकामी उप-व्यवस्थापक उत्तम निवृत्तीराव रायपल्ले यांना प्रथमदर्शी जबाबदार धरण्यात आले आहे.
प्रस्तुत कामात झालेल्या विलंब आणि अनियमिततेबदल उत्तम रायपल्ले यांना महावितरणच्या कर्मचारी सेवाविनिमय 2005 मधील तरतुदीनुसार मार्च 2022 च्या वेतनात दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस बजावून पाच दिवसाच्या आत लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता लातूर तर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.