By MahaTimes ऑनलाइन – बीड |
रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत बीड जिल्ह्याच्या मुर्शदपूर (ता. आष्टी) चा रहिवाशी असलेला अनिकेत भाऊसाहेब लटपटे (वय 20) हा युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी तो युक्रेनमध्ये गेला होता. खारक्यू नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, खारक्यू, युक्रेन अंतर्गत वैद्यकीय शिक्षण घेत असून तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तिथे युद्ध सदृष्य स्थिती उद्भवल्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नसल्याची माहिती अनिकेत चे वडील भाऊसाहेब लटपटे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभय जोशी यांच्याकडे दिली आहे.
याबाबतची नोंद घेऊन विभागीय आयुक्तालयास कळविले आहे. राज्य सरकार, प्रशासन केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ संपर्क साधावा – जिल्हाधिकारी
बीड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी. जेणेकरुन त्यांना सुखरूपपणे भारतात परत येता यावे यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संपर्क साधून मदतीची यंत्रणा तत्पर ठेवली आहे. नातलगांसाठी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1950 किंवा (02442)222604 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे.