95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिध्द कवी इंद्रजीत भालेराव यांच्या उपस्थिती राहणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या ऊसतोड महिला मजूरांची कथने असलेल्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई प्रकाशित ‘झुंज तिची पाचटाशी’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. 9) सकाळी 11 वा. सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे.
हा प्रकाशन सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून यावेळी 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिध्द कवी इंद्रजीत भालेराव, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदींची उपस्थिती राहणार आहे.
सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य विख्यात लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून डॉ.दीपा क्षीरसागर यांना सबंध मराठवाडा ओळखतो. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेकदा राजकीय पदावरही यशस्वीपणे काम केलेले आहे. संगीत, नाट्य, कला या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आजवर त्यांनी एकूण लिखीत आणि संपादित मिळून 14 ग्रंथाचे लेखन केलेले आहे. विषयवैविध्य असलेले त्यांची ही ग्रंथसंपदा साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आहे.
ऊसतोड मजुरांच्या जीवनावर मार्मिक भाष्य
‘झुंज तिची पाचटाशी’ या पुस्तक बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला मजुरांची कथने असलेले पुस्तक आहे. लौकिक अर्थाने जरी बीड जिल्हयातील ऊसतोड महिला मजुरांच्या जीवनावर भाष्य असले तरी, व्यापक अर्थाने यातील आशय सबंध भारतातील ऊसतोड महिला मजुरांच्या व्यथा वेदनांशी संवाद साधताना दिसतो. हे ललित स्वरूपाचे लेखन आहे. यातील पात्रांची नावे काल्पनिक आहेत तर गावांची नावे बदललेली आहेत. एक संवेदशनशील लेखिका म्हणून डॉ. क्षीरसागर यांनी सदर महिलांची दु:खे जाणून घेऊन त्यांना कल्पनेच्या परिप्रेक्ष्यातून कागदावर मूर्तरूप प्राप्त करून देण्याचा केलेला प्रयत्न आहे. लेखिकेची समाजप्रती असलेली सामाजिक बांधिलकी येथे अधोरेखित होताना दिसते. पुस्तकप्रेमी, वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे.