By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून दर्पणकार पुरस्कार वितरण सोहळा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या शुभहस्ते तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दर्पण दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील समाजसेवकांचा देखील गुणगौरव करण्यात येणार आहे.

बीड येथील स.मा.गर्गे भवन नाट्यगृहाजवळ, डीपी रोड बीड येथे आज गुरुवार दि. 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता दर्पणदिना निमित्त सुप्रसिध्द बासरी वादक अमर डागा यांच्या सुमधूर बासरी वादनाचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता दर्पण दिन सोहळा संपन्न होणार असुन मान्यवरांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दर्पण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दर्पणकार पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यावर्षी बीडचे दर्पणकार म्हणून ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर आदर्श वृत्तपत्र विक्रेते म्हणून प्रतापराव सासवडे यांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सामाजिक कार्य करणार्या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या दर्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार उषाताई दराडे, ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व संपादकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या दर्पण सोहळ्याला बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव, भगिनी तसेच पत्रकार प्रेमी प्रतिष्ठीत नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी व बीड जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव, श्रीमती प्रतिभा गणोरकर, रईस खान, शेख अय्युब, अमजद पठाण, शेख वसीम, आत्माराम वाव्हळ आदिंनी केले आहे.