बीड मध्ये हजारोंच्या साक्षीने ‘मविआ’चे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा निर्धार
या अखेरच्या सभेमुळे लोकसभेचे वारे पलटले
By MahaTimes ऑनलाइन |
बीड: शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील. तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे पाटलांना भेटलो.
त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणताही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.बीड लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनील देशमूख, फौजीया खान, आ.राजेश टोपे, आ.संदीप क्षीरसागर, उमेदवार बजरंग सोनवणे, माजी आ.उषा दराडे, मा.आ.साहेबराव दरेकर, शिवसेना जिल्हाप्रमूख गणेश वरेकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले,आज मला एका गोष्टीची आठवण होते. बीड जिल्ह्यात संकट असेल दुष्काळ असेल, पण मनाने अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये मी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले. या जिल्ह्याने ऐतिहासिक काम करुन दाखवले. आमदार दिले पण सत्ता दुसऱ्यांना दिली. आमदार सगळे आपले पण सत्ता दुसरीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचं दुखणं कमी कसं करायचं? असा सवालही पवार यांनी केला.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली.
त्यावेळी बीडमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला माजी हजेरी होती. व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. नाना पाटील सातारा जिल्ह्याचे होते. उभे राहिले बीड जिल्ह्यात. या जिल्ह्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी त्याग केला. मोठ्या नेत्याचा सन्मान केला. नाना पाटील यांनी या जिल्ह्यात घोषणा केली होती. मात्र, सरकार बदल्यामुळे ती त्यांना पाळता आली नाही. सत्ता हातात आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरली नाही. मात्र, बीड जिल्ह्याने आमचे आमदार सर्व आमदार निवडून दिले. त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आत ७१ हजार कोटींचं कर्ज माफ केलं. याचा लाभ देशातील सर्व राज्यांना झाला. ही कर्जमाफी संबंध देशातील लोकांना मिळाली. आज काय स्थिती आहे?, देश नरेंद्र मोदींच्या हातात आहे. अनेक भाषणं करतात. मात्र, शेतमालाला किंमत नाही. सर्व देशातील सत्ता हातात आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरली नाही. दिल्लीत पंजाब, हरियणा भागातील शेतकरी दिल्लीत बसले. हमीभाव मिळावी, अशी मागणी केली, असंही शरद पवार म्हणाले.नरेंद्र मोदीचे सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका.
या सरकारला शेतकऱ्यांचा हिसका दाखवून द्या, अलिकडे दडपशाही सुरू झाली आहे. दिल्लीत चांगले सरकार चालविणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये घातले. सत्तेची गुर्मी आणि गैरवापर या सरकारकडून सुरू आहे. यांच्या सत्ता इतकी डोक्यात गेली आहे की कोणी टिका केली तर त्यांना सहन होत नाही. यामुळे मोदींना मदत होईल, असे काम मतदानातून करू नका. त्यांना रोखण्यासाठी बजरंग सोनवणेंना निवडूण द्या, या दुष्काळी भागात ऊसाला चांगला भाव देणाऱ्यांना विजयी करा, असे अवाहनही पवार यांनी केले.आज बीड मध्ये झालेली शरद पवारांची सभा ऐतिहासिक ठरली. हजारोंच्या साक्षीने ‘मविआ’चे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. पवार आले व जिल्हावासियांची मने जिकली. या अखेरच्या सभेमुळे लोकसभेचे वारे पालटल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कोण काय म्हणाले..
संदीप क्षीरसागर: बीड जिल्हा हा शरद पवार यांच्या विचाराचा आहे. ज्यांनी आपल्याला सोडले त्यांना परत घेवू नका, आपली सत्ता येणार असून बजरंग सोनवणे यांना निवडूण आणा.
अनिल देशमूख: भारतीय जनता पार्टीविरूध्द देशात रोष आहे. महागाई आणि रोजगाराने सामान्यांची वाट लागली. शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्याला भाव मिळत नाही. यामुळे अशा लोकांना पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका.
राजेश टोपे: सर्व क्षेत्रातला अनुभव असलेला कुशल संघटक, तुमचा आवाज सभागृहात बुलंद करेल, अशा बजरंग सोनवणे यांना निवडूण द्या. लोभ आणि लाभापाई सद्या भारतीय जनता पार्टीकडे लोक गेले. ते द्वेशाचे राजकारण करत आहेत.
बजरंग सोनवणे: बीड जिल्ह्यात प्रस्तापितांच्या विरोधात लाट निर्माण झालेली आहे. गावागावात तुतारी वाजत आहे. साहेबांच्या समोर शब्द देतो, उतणार नाही, मातणार नाही. समोरचे लोक ओबीसीचे राजकारण करत आहेत, परंतु ओबीसींसाठी तुम्ही काय केलं हे तर सांगा. मी शेतकऱ्यांचे, त्यांच्या लेकरांचे भले करण्याचे काम करायचे आहे. मला त्यांची पालखी वहायची आहे. तुमचा सालगडी म्हणून राबण्याची संधी द्या.
सुरेश नवले: ७५ वर्षाचा तरूण सेनानी महाविकास आघाडीचे नेतृत्व करत आहे. याच बळावर भाजपचा तंबू हवेत फेकला जाईल. परळीची मक्तेदारी मोडीत काढून बजरंगला खासदार करा.
सय्यद सलिम: पालकमंत्री म्हणतात जातीवाद करू नका, पण त्यांच्याच समोर मोदींनी मुस्लिमांबाबत बोलून जातीयवाद केला.
गणेश वरेकर: उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पायऊतार व्हावे लागले. त्यावेळी शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होते. त्या पाण्याचा बदला घेण्याची वेळ आलीय.
उत्तम जाणकर: भाजपवाले विकास केल्याचे सांगतात. तर मग मोदींना माळसिरसच्या बाजारात फिरण्याची का वेळ आली. ज्यांनी धरगर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांच्या हातात आपली काठी न देता, त्यांच्या पाठीत काठी घाला.