By MahaTimes ऑनलाइन |
बीड: बीड लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून जिल्ह्यात हि निवडणूक विकासाच्या मुद्यावरून जातीच्या मुद्यावर जाताना दिसत आहे यातच आता मोदींच्या बीडमधील प्रचारसभेचा मुहूर्त ठरला असून मंगळवार, 7 मे रोजी सायंकाळी 5 वा.नरेंद्र मोदींची पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे सभा होणार आहे.
बीड मध्ये सध्या तरी तिरंगी निवडणूक होत असल्याचे चित्र आहे. यातच पंतप्रधान बीड मध्ये सभा घेत असल्याने आणखी रंगात वाढणार आहे. भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं असून पंकजा मुंडेंना तेथून उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचं स्वागत करुन पंकजा यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन बीड जिल्हा गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात चर्चेत आहे. त्यातच, अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तर, बीड जिल्ह्यात त्यांचे सातत्याने दौरे होत असून मराठा समाजासाठी विविध ठिकाणी बैठकाही होत आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळत आहे. जरांगे यांनी कोणाला पाडायचे त्याला पाडा, असे म्हणत मराठा समाजाला संकेत दिले आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.
पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये अद्याप कुठल्याही भाजपाच्या बड्या नेत्याने सभा घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बीडमध्ये प्रचारासाठी येत आहे. मोदींच्या बीडमधील प्रचारसभेचा मुहूर्त ठरला असून 7 मे रोजी नरेंद्र मोदींची येथे सभा होणार आहे. मनोज जरागेंचं वास्तव्य असलेल्या बीडमध्ये मोदींची सभा होत असल्याने येथील मराठा समाज मोदींच्या सभेकडे कसं पाहतो, काय भूमिका घेतो, याची चर्चा होत आहे.