बजरंग सोनवणे 22 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम करण्यासाठी वज्रमुठ बांधली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी अधिसूचना काढण्यात आलेली आहे 22 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे हे उमेदवारी भरणार आहेत याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी व स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजसाहेब देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, माजी आमदार सय्यद सलीम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड नामदेव चव्हाण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एड. अजय बुरांडे आप चे अध्यक्ष अशोक येडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब घुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, माजी आ. उषाताई दराडे डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, वकील आघाडीच्या नेत्या हेमा पिंपळे, राष्ट्रवादीचे नेते नवीदुज्जम्मा सय्यद, भाई मोहन गुंड, प्रा प्रशांत पवार आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय व सामाजिक स्थिती पत्रकारांसमोर विशद केली रेल्वेचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न महिलांच्या व मुलींच्या अनेक प्रश्नाबाबत विद्यमान नेतृत्व उदासीन आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना परिवर्तनाची गरज वाटत असल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी देशातली एकाधिकारशाही व हुकूमशाही नष्ट करण्यासाठी आम्ही इंडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सामील झालेलो आहोत मार्क्सवादी कमिट पक्षाचा व भाकपाचा या जिल्ह्याला मोठा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे एडवोकेट अजय बुरांडे व आम्ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी गणेश वरेकर यांनी शिवसेना ही गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची मजबूत टीम आहे पूर्ण ताकतीने ती बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगितले. तर, काँग्रेस पक्षाच्या नेत्या रजनीताई पाटील व अशोक पाटील यांनी बीड जिल्ह्यात सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या समोरच कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख यांनी दिली आहे यावेळी बोलताना परमेश्वर सातपुते व रत्नाकर शिंदे यांनी शिवसेना ही संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कामात सक्रिय झालेली असल्याचे सांगितले तर देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या आम आदमीच्या नेत्यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले मात्र या सरकारची एकाधिकारशाही सहन केली नाही त्यामुळे आमचे नेते जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे देशातल्या सत्ता परिवर्तनात आम आदमीचा वाटा असल्याचा उल्लेख जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केला तर शेतकरी कामगार पक्ष हा कायम महाविकास आघाडीचा घटक राहिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीची जी निश्चित अशी भूमिका ठरेल त्यात आम्ही सहभागी आहोत असा उल्लेख बाळासाहेब घुमरे यांनी केला.
यावेळी बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण राजकीय वातावरणाचा विचार करता महाविकास आघाडी ही सशक्तपणे निवडणुकीला सामोरे जात आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी दिली व पत्रकार परिषदेचा समारोप केला.