By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये पत्रकारांचे सहकार्य मिळावे,निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्राची भूमिका महत्त्वाची असून आदर्श आचार संहितेचे पालन वर्तमानपत्राकडूनही व्हावे, असे सांगून वर्तमानपत्रांनी यावेळी कुठल्याही पक्षाला अधिक महत्त्व न देता वस्तुनिष्ठ पद्धतीने बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी यावेळी केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाली असून चौथा टप्प्यात बीड जिल्ह्यात 13 मे ला मतदान होणार आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात कऱण्यात आले, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव, उपजिल्हानिवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.
निवडणुकीदरम्यान विविध समित्या गठित करण्यात येतात या अंतर्गत माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती तसेच माध्यम कक्ष गठित करण्यात आलेले आहे. एखाद्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक सामाजिक माध्यमावर आक्षेप असणाऱ्या बातमी आल्यास बातमी देणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे सर्वांनी निवडणुकीला पोषक असणाऱ्या बातम्या देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. एक सारख्या मथळ्याच्या असणाऱ्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित होत असून या बातम्या पेड न्यूज अंतर्गत मोडले जातात असे आढळून आल्यास वर्तमानपत्रावर कारवाई करण्यात येईल.
शासन मान्यता यादीवर नसलेले तसेच अनाधिकृतपणे काढले जाणाऱ्या वर्तमानपत्रावरही कारवाई होणार असल्याने यापुढे सर्वांनीच दक्षता घ्यावी असेही, जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.