देशभरात सात, महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात निवडणुक होणार; चौथ्या टप्प्यात बीडला मतदान
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : देशात 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे आणि लोकसभा मतदान प्रक्रिया सहा जूनला संपणार. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार असून चौथ्या टप्प्यात 39 बीड लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदानात 39 बीड मतदार संघातही मतदान होईल. चौथ्या टप्प्यात बीडसह नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजी नगर मवाळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघातही मतदान होईल.
देशात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. या टप्प्यात बीडमध्येही मतदान होईल.
