‘घड्याळ तेच… वेळ नवी… निर्धार नवपर्वाचा…!
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, मोईन मास्टर, नसीम इनामदार, शेख शाकेर यांच्यासह बीडमधील अनुभवी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी येत्या मंगळवारी (दि.५) पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुडे, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडीत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

बीड नगरपालिकेत दीर्घकाळ कामाचा अनुभव असलेले पालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल यांच्यासह बांधकाम सभापती आणि गटनेते म्हणून काम पाहिलेले अमर नाईकवाडे यांच्यासह मोईन मास्टर, जलील पठाण, प्रभाकर पोपळे, शेख शाकेर, नसीम इनामदार, भैय्या मोरे, अशफाक इनामदार, गणेश तांदळे, शेख सादेक, व प्रमुख पदाधिकान्यांचा प्रवेश सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडीत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि.५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता गरवारे क्लब हाऊस, मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.
बीड नगरपालिकेत विविध पदांवर काम केलेल्या अनुभवी आणि अभ्यासू नेत्यांसह माजी नगरसेवकांची बीड मतदार संघात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्यासाठी अनुभवी आणि तरुण सहकाऱ्यांची टीम मिळाली आहे. ‘घड्याळ तेच… वेळ नवी… निर्धार नवपर्वाचा…! ही टॅगलाईन या पक्ष प्रवेशासाठी पदाधिकाऱ्यांनी वापरली आहे.
या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठी राजकीय ताकद मिळणार आहे. मुंबईत मंगळवारी सायंकाळी पार पडणाऱ्या या पक्ष प्रवेशाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
