शासकीय महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहरकडून यावर्षीचीही शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. शासकीय महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे जयंती उत्सवाचे स्वरूप असून जयंती साजरी करण्यासाठी सर्व बीडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर व जयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेने चर्चेत राहणारी बीड शहराची सार्वजनिक शिवजयंती यावेळेसही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळा परिसरात महापूजा व अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना सर्व बीडकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता साळुंके, उपाध्यक्ष सिद्दीक फारूखी यांच्यासह समितीकडून करण्यात आले आहे.
ही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध ढोल पथक, दिल्ली येथील स्टंट ग्रूप, केरळ येथील मार्शल आर्ट संघ, आंतरराष्ट्रीय लेझर-शो, आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईट-साऊंड शो अशाप्रकारचे कार्यक्रम यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामन्यात जो लेजर शो होता तोच लेजर शो यावेळी शिवजयंतीच्या निमित्ताने बीडकरांना अनुभवायला मिळणार आहे. या लेजर शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी जीवनपट दाखवला जाणार आहे
महिला भगिनींचा होणार विशेष सन्मान
सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिला भगिनींचा फेटे बांधून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली असून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाचे मागील प्रवेशद्वार (स्काऊट भवन कडील) महिलांसाठी राखीव आहे.