20 जानेवारीपासून आझाद मैदानावर जरांगेंचे आमरण उपोषण
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सरकारने आता आंतरवालीसारखा प्रयत्न पुन्हा करू नये, कारण मराठे शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांना पुन्हा डिवचलं तर ते शांत बसणार नाहीत. येत्या 20 जानेवारी पासुन मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असुन समर्थनार्थ आंतरवली ते मुंबई मराठे कूच करणार आहेत. जवळपास दो कोटीवर मराठे मुंबईत जमा होणार असुन आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीड येथे झालेल्या भव्य सभेला संबोधित करताना दिला. दरम्यान त्यांनी राज्य सरकार, छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टिका केली.

मराठा आरक्षणासाठी रान उठवणार्या मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. आज शनिवारी जरांगे यांनी बीड येथे निर्णायक सभा घेत सरकारला अखेरचा इशारा दिला आहे. सरकार आंदोलनास गांभीरयाने घेत नसुन आता पर्यंत कोणतेही आश्वासक पाऊल न उचलल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पुढे म्हणाले की, घर, हॉटेल जाळल्याचा आरोप करीत मराठ्यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. निष्पाप मराठ्यांना मध्ये टाकले. मात्र, यांनी यांचेच हॉटेल जाळले असा आरोप जरांगे यांनी केला. मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, त्यांना हुसकवू नका. ते कधीच जाळपोळ करू शकत नाहीत, असंही जरांगे पाटील म्हणाले.
बीड शहरात जरांगे यांचे मुस्लिम बांधवांकडून जंगी स्वागत

यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील टीका केली. ते येवल्याच ****, त्याचच सरकार ऐकतय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडतंय, त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग, असं म्हणत जरांगेंनी आगपाखड केली. जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही. शासनाला माझी विंनती आहे, येथे हजारो माता मावल्या लेकरांना घेऊन उन्हात बसल्यात, आमची एकच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण.. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. मराठ्यांना आरक्षण द्यावं, नसता सगळ्यांनी ठरवलं तर तुमचा सुपडा साफ होईल,असंही जरांगे म्हणाले आहेत.तुम्ही आता पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात, मी मॅनेज होत नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे.
सभेत उपस्थित लाखों मराठ्यांना उद्देशून जरांगे म्हणाले की, आरक्षण मिळविण्याची एवढीच संधी, संधीच सोन करा. आपल्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात. मला हे दुश्मन समजतायेत. सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे. जे आपल्या लेकरांच्या सोबत तोच आपला. आपलं मत घेण्यापुरता जर दारात आला तर चपलानं हाना. आंदोलन करायचं पण शांततेने, पण मराठा आरक्षण भेटल्याशिवाय पुन्हा हटायचे नाही. तुम्ही किती वेळ मागणार आणि आम्ही किती दिवस वेळ देणार? असा सवाल देखील त्यांनी केला.
मराठा आरक्षण मिळे पर्यंत सोबत…सय्यद सलीम : जंरागे यांनी मुस्लिम आरक्षण बाबतीत लक्ष दयावे…..शेख निजाम
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनांची विहित मुदतीत पूर्तता करण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेचे आयोजन पाटील मैदान बायपास बीड येथे करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील यांना सकल मुस्लिम समाजातर्फे मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्णपणे पाठिंबा देण्यात आला व सभे साठी ग्रामीण भागातून आलेल्या सर्वा साठी पिण्याच्या पाणी बॉटल व नाश्ता ची सोय उपलब्ध केली होती यावेळी बीड नगरीत आगमनानिमित्त माननीय मनोज जरांगे पाटील यांचे सकल मुस्लिम समाजातर्फे स्वागत माजी आमदार सय्यद सलीम साहेब, शेख निजाम जैनुद्दीन शहर प्रमुख शिवसेना, जावेद भैय्या कुरेशी समाजसेवक,काझी मकदुम, अब्दुल वकील सर, अस्लम अनवरी , खालिद फारुखी, शेख अमर जैनुद्दीन ,खय्युम इनामदार, मोमीन जुबेर, हाफिज अश्फाक,सादेक सिद्धीकी,शेख पाशा,सय्यद फहीम,अब्दुल खदिर,शेख अखलाक, मौलाना मोसिन, उलेमा इक्राम व अनेक मान्यवर उपस्थित होते.
बार्शी नाका येथे जरांगे पाटलांचे ‘तहे दिलसे’ स्वागत
बीड शहरातील बार्शी नाका येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गळ्यात हिरवा, भगवा गमछा घालून समस्त मुस्लिम समाजाने जरांगे पाटलांचे ‘तहे दिलसे’ स्वागत करत भाईचाऱ्याचा संदेश दिला. एवढेच नव्हे तर भैय्या आप लढों, हम आपके साथ है हा विश्वासही दिला. यावेळी मुफती अब्दुल्लाह साहाब, अलिमशेठ कुरेशी, मौलाना मंजुर साहाब, फारूक पटेल, सलिम जहाँगिर, खुर्शीद आलम, जलील खान, सादेक मेंबर, रफिक कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष शेख शाकेर, रफिक भाई यांच्यासह समस्त मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
