शासन आपल्या दारी कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांची प्रमुख उपस्थिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : परळी वैद्यनाथ तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत विकास कामांचे भुमीपूजन आणि शासन आपल्या दारी अंतर्गत लाभ वाटपाचा कार्यक्रम उद्या परळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतील.
परळी येथे ओपळे मैदानात उभारलेल्या भव्य मंडपात हा सोहळा होणार आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हयात विविध प्रकल्पांना मान्यता प्राप्त करुन घेतली आहे. यासाठी शासनाने निधीची मान्यता देखील दिली आहे. परळी वैद्यनाथ विकास आराखडा 286 कोटी 68 लाख रुपयांचा असून त्याचे प्रत्यक्ष भुमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल. परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भूमिपूजन, परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन, परळी तालुक्यात कृषी विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन, परळी शहर बसस्थानकाच्या सुधारित कामाचे भूमिपूजन, यांसह बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना विविध योजनेतील लाभाचे थेट वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यक्रम होण्यापूर्वी श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री गोपीनाथ गड येथे जाणार आहेत. त्यानंतर परळी येथे श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन व भुमीपूजन होईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन झाल्यानंतर रॅलीव्दारे ते कार्यक्रम स्थळी पोहचणार आहेत. कार्यक्रम स्थळी विविध विभागानी आपआपल्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारले आहेत.
Advt.