ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांची पत्रकार परिषद
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आयकर विभागाची छापेमारी सुरु असतांना अचानक अफवा पसरवल्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ग्राहकांनी ठेवी परत घेण्यासाठी रांग लावली. आम्ही अनेक जणांच्या ठेवी परत दिल्या मात्र, दुसरीकडे ग्राहकांचा एक मोठा वर्ग आमच्या वर विश्वास ठेऊन होता. अशा संकटसमयी मिडीयांनी सत्य परिस्थिती समोर आणत सकारात्मक बातम्या प्रकाशित करीत आम्हाला गंभीर साथ दिली. यामुळे आम्हाला एक प्रकारे बळ मिळाले. आम्ही आपले ऋणी आहोत. यातुन आमची उतराई कदापि शक्य नाही अशी भावना ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

कुटे ग्रुप कंपनीत आयकर विभागाची तपासणी सुरू होती. आमच्यावर झालेली छापेमारी माझ्यासाठी एक मोठा आघात होता. दरम्यान इच्छा असुनही लोकांना भेटता येतं नव्हते. कुटे ग्रुप व ज्ञानराधा या दोन्ही वेगवेगळया संस्था असतांना अचानक अफवा पसरली. ग्राहक चिंतेत होते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. ज्ञानराधाच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षात आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. 51 शाखेतून आम्हाला सर्वांनी खूप पाठिंबा दिला. हे कधीच विसरू शकणार नाही. आता सर्व सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करीत सुरेश कुटे यांनी सांगितले की, आम्ही शुन्यातुन हे सर्व निर्माण केले आहे. खरं तर आपल्या प्रेमाने आम्हाला मोठं केल पण आम्ही जमिनीशी नाळ जोडली आहे.
आम्ही जे आहोत ते आपल्यामुळेच, आता सर्व सुरळीत होईल उद्यापासून मी बँकेत पुन्हा सर्वांना भेटणार आहे. आज दोन तासात अनेक शाखांना भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. अडचणीच्या काळात ग्राहकांनी आम्हाला खूप जीव लावला. यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं असे म्हणत सुरेश कुटे भावनिक झाल्याचे दिसले.
कुटे ग्रुप व ज्ञानराधा या दोन्ही स्वतंत्र संस्था -अर्चना कुटे
पत्रकार परिषदेत बोलतांना अर्चना कुटे म्हणाल्या की कुटे ग्रुप व ज्ञानराधा मल्टीस्टेट या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत. इन्कम टॅक्सची तपासणी सर्वत्र होते, त्यांचा हा दैनिक कार्याचा भाग आहे. मात्र आमच्यासाठी हा धक्का होता. यातून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आपली माणसं ओळखता आली. तुमचा विश्वास आम्हाला बळ देणारा ठरल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.