लाठीचार्ज चा काळ्या फिती लावून निषेध
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीडचे भूमिपुत्र मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आंतरवली(सराटा) येथे उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी बीड,गेवराई, माजलगाव,शहागड,अंबड,जालना येथील 400 ते 500 डाॅक्टर व फार्मासिस्ट व टेक्निशियन यांनी आज पदयात्रा काढत मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शविला.तसेच निरपराध लोकांवर जो अन्यायकारक लाठीचार्ज झाला होता त्याचाही काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंतरवलीतील एक मराठा आंदोलन सुरु करता झाला आणि बघता बघता लाखो मराठे या आंदोलनात सहभागी झाली यावरुन “एक मराठा लाख मराठा” ही घोषणा किती सत्य आहे याची प्रचिती आली.
काही विशिष्ट मराठे श्रीमंत असले तरी बहुसंख्य मराठा समाज गरीबच आहे. त्यांचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कायद्याच्या कच्याटात न सापडता देण्यात यावे अशी रास्त सर्व मराठा डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचा-यांनी केली. त्यासाठी मनोज जरांगे यांनी जीवाची बाजी लावली आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर मागणी मान्य करुन मराठा समाजाचा आशिर्वाद राज्यकर्त्यांनी घ्यावा अशी आग्रही मागणी पदयात्रेतील डाॅक्टरांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी नंतर मार्गदर्शन करताना डाॅक्टर सारख्या बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाची दखल घेत पाठींबा दर्शविला याबद्दल समाधान व्यक्त केले.डाॅक्टर व वकिल या वर्गाने आंदोलनातील कार्यकर्त्यांना जी वैद्यकीय वा कायदेशीर मदत लागेल ती त्वरीत व मोफत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डाॅक्टरांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य उपचार देण्याचे आश्वासन दिले.