संदीप क्षीरसागर : दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. ते स्वतः आपल्या जिल्ह्यात येत आहेत. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पवार साहेबांची सभा आपण एकसाथीने, एकसोबतीने आपण यशस्वी करू असे आ.संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत निश्चय केला.
राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोट पुन्हा बांधण्यासाठी कंबर कसली आहे. येवल्यानंतर आता बीडमध्ये 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची सभा होणार आहे.आ.संदीप क्षीरसागरांकडून या सभेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाभर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
या सभेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी आ.क्षीरसागर आता कामाला लागले आहेत. सोमवारी (दि.7) रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया हॉटेलमध्ये येळंबघाट, नेकनूर, मांजरसुंबा, लिंबागणेश, चौसाळा, बोरखेड, पाली पंचायत समिती गणातील तर राजुरी (न.) येथील श्री मंगलमुर्ती देवस्थान च्या सभागृहात राजुरी (न.), कामखेडा, चर्हाटा या पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. पहिले दोन दिवस बीड मतदारसंघात व नंतर संपूर्ण जिल्ह्यात सभेच्या तयारीसाठी, आ.संदीप क्षीरसागर बैठका घेणार आहेत.
सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
17 ऑगस्ट रोजी होणार्या खा.शरदचंद्र पवार यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. ही सभा ऐतिहासिक व भव्य व्हावी याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांची यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. या बैठकीचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यात बीड सह शिरूर -कासार, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, वडवणी, गेवराई या 11 तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर बैठका घेणार आहेत.