महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र शासनाने पत्रकारांची शासकीय अधिस्वीकृती समिती नुकतीच जाहीर केली आहे. या समितीमध्ये चुकीचा प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाने स्वीकारुन मंजूर केला आहे. या संदर्भात दोषी असणार्यांवर कारवाई करावी आणि जे पात्र असतील त्याच पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांना शासकीय अधिस्वीकृती समितीमध्ये संधी द्यावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना देण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन माहिती कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले.
या अधिस्वीकृती समिती संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार करावा आणि नियमबाह्य गठित झालेली समिती तात्काळ रद्द करुन पंधरा दिवसाच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या विरोधात, राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रिया विरुध्द राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरुन लोकशाही पध्दतीने आंदोलन करतील आणि न्याय हक्कासाठी नाईलाजास्तव सरकार आणि माहिती व जनसंपर्क विभागाविरुध्द पत्रकार संघ न्याय मागेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच माहिती महासंचालक मुंबई, विभागीय माहिती उपसंचालक तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांना सोमवार दि. 17 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील जिल्हा माहिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, ज्येष्ठ संपादक शेखर कुमार, राज्य कार्यकारीणी सदस्य बाबा देशमाने, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, व्हाईस मिडीयाचे संजय मालानी, बालाजी मारगुडे, अप्पासाहेब मोहकर, आमेर हुसेन, नाना नागरे, संदीप बेदरे, प्रचंड सोळंके, रईस खान, शेख आय्युब, शेख आयेशा, अनुप्रिती मोरे, ज्ञानोबा वायबसे, संतोष राजपूत, काझी समीर, बालाजी जगतकर, इरफान पठाण, अमित सासवडे आदिंची उपस्थिती होती.
न्यास नोंदणी संस्थेला संघटना गृहित धरुन नियम बाह्य नियुक्ती
धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या पत्रकारांच्या सेवा संस्थेला संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती देण्यात आली आहे. वास्तविक न्यास नोंदणी आणि संघटना नोंदणीचे स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत. असे असतानाही महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने 11 जुलै 2023 रोजी राज्य अधिस्वीकृती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. याच आदेशात मराठी पत्रकार परिषद या संघटनेवर धर्मादाय सहआयुक्त पुणे यांनी प्रशासक नियुक्त असल्याचे स्पष्ट करुन संघटनेच्या सदस्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या उक्त निकालाच्या अधिन राहून करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. समितीवरील एकूण 45 सदस्यांपैकी राज्यावर पाच आणि विभागावर नऊ असे 14 सदस्य घेण्यात आले आहेत. श्रमिक पत्रकार संघटना, संपादक परिषद, मंत्रालय विधीमंडळ, जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ, वृत्तपत्र संघटना, साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद अशा संघटनेच्या पदाधिकार्यांना सदस्य म्हणून नियम बाह्य घेण्यात आले आहे.