पाटोद्यात कृषी सहायक तर, वडवणीत ग्रामसेवकास रंगेहात पकडले
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यात बुधवारी दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. पाटोद्यात कृषी सहायक तर वडवणीत ग्रामसेवकास रंगेहात पकडण्यात बीड व उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधकास यश आले आहे. ह्या कार्यवाया स्वतंत्ररित्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहिती अशी की, पाटोदा येथील कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक अतिरिक्त पदभार मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्र मांक 2 लोकसेवक कृष्णा महादेव आगलावे (वय 40) मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्र मांक 2, तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाटोदा) या आरोपी लोकसेवकाने तक्रारदार यांना अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी कांदा चाळीची पाहणी केलेला अहवाल व बिले अपलोड करण्यासाठी आगलावे यांनी पंचासमक्ष दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड हजार रु पयांची लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र परदेशी, अमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांनी केली.
ग्रामसेवक जांभळेंनी घेतली लाच
वडवणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ढोरवाडी ग्राम पंचायत चे ग्रामसेवक वसंत बळवंतराव जांभळे यांनी तक्रारदारास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत विहीर मंजूर करुन देण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन सदरची फाईल तयार करण्यासाठी दहा हजार रु पयांची लाचेची मागणी करुन पंचासमक्ष दहा हजार रुपये स्विकारले. ही कारवाई उस्मानाबाद येथील निरीक्षक अशोक हुलगे, सिद्धेश्वर तावसकर, दत्तात्रय करडे, बीडचे अंमलदार संतोष राठोड, अविनाश गवळी यानी केली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.