गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३ मधील इयत्ता बारावीच्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये बीड शहरातील नामवंत मिल्लिया कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उज्वल व घवघवीत लागला असून विशेष म्हणजे येथेही मुलींनी बाजी मारली आहे.

यामध्ये विज्ञान शाखेत परीक्षा दिलेल्या एकूण ३१२ विद्यार्थ्यांमधून ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत एकूण ५० विद्यार्थ्यांमधून ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये ७० मधून ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये २४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून द्वितीय श्रेणी मध्ये १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात रिदा फातिमा उमेर सलीम हिने ८९.१७, मदिहा नूर शेख शकील ही विद्यार्थिनी ८६.००, शेख आयेशा तजीन अब्दुल अजीम हिने ८४.५०, उस्मानी तय्यबा समीर अजमत अली हिने ८३.००, मिर्झा अहेमद बेग मिर्झा मुजाहिद बेग याने ८२.८३, शेख अफिफा सरोश शेख शकील हिने ८२.५०, शेख शफीन एजाज हिने ८२.३३, शेख आलिया फिरदोस ज़कीयोद्दीन हिने ८२.००, शोएब शेख मुश्ताक शेख याने ८१.१७, शेख उजेर अतीख याने ८०.८३ या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
यानिमित्ताने मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कार सोहळ्यात बोलताना अंजुमन ईशाअत ए तालीम च्या सचिव खान सबीहा बेगम यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन करत हार्दिक शुभेच्छा दिल्या. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मला आनंद वाटतो की आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. आता शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आपण ओलांडला असून यापुढेही आपल्याला शैक्षणिक पातळीवर अजून उंच जायचे आहे. यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अशाच तळमळीने अभ्यास करून दरवर्षी उत्तरोत्तर प्रगती साधावी. आता तुम्ही जे यश प्राप्त केले आहे त्या शैक्षणिक यशाचा फायदा पुढे चालून तुमच्याकडून समाजात इतरांनाही व्हावा असे म्हटले.
यावेळी प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार, उपप्राचार्य डॉ. फैसल चाऊस, प्रा. अब्दुल रज़्ज़ाक़ यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन अहेमद चाऊस, डॉ. शेख समीर, डॉ. इलियास फाज़ील, डॉ. सय्यद शफीयोद्दीन, प्रा. खतीब मुहम्मद समीयोद्दीन, प्रा. बद्रुद्दीन ख्वाजा, प्रा. जावेद पाशा आणि इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.