दोन गंभीर जखमी; अहमदनगर तालुक्यातील जामखेड येथील दुदैवी घटना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे स्वयंचलित अग्निशमन यंत्र (फायरबॉल) बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याने आग लागली. यात दोन कर्मचारी ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. स्फोटामुळे कंपनीच्या भिंतीचे नुकसान झाले. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेत जहीर सत्तार मुलाणी (वय 41 रा. तेरखेडा. ता. वाशी) व ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे (वय 45 रा. घोडेगाव. ता.जामखेड) यांचा मृत्यू झाला. तर कारखान्याच्या बाजूला थांबलेले दोघे जण गंभीर जखमी झाले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, जामखेड शहर परिसरात नगर रोडवर पंकज शेळके यांच्या मालकीचा रेडमॅटिक ऑटोमॅटिक फायर फायटर कारखाना आहे. मोठमोठ्या इमारतींमध्ये वापरले जाणारे अग्निशमन यंत्राचे येथे गेली दोन वर्षांपासून उत्पादन केले जाते. शनिवारी दुपारी कारखान्याचे कर्मचारी जहीर सत्तार मुलाणी आणि ज्ञानेश्वर चंद्रकांत भोंडवे हे काम करत असताना अन्य दोघे कारखान्याबाहेर उभे होते. अचानक कारखान्यात मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की इमारतीच्या भिंतीला तडे गेले. त्यातून धुराचा मोठा लोट बाहेर निघाला आणि ते उपस्थित लोग दूरवर पळाले. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. पण धूर प्रचंड होता आणि आत एका पाठोपाठ स्फोट होत होते. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.
सदर घटनेची माहिती समजताच जामखेड नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर आत प्रवेश केला असता दोन कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत.