केज, बीडमध्ये गारपीट, आष्टीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
जिल्हाभरात एक डजनवर जनावरे ठार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलका व मध्यम पाऊस झाला. बीड तालुक्यातील नागझरी व परिसरात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा, फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले. शेतात जणू काही गारांचा सडा पसरला होता.
बिंदुसरा नदीला पाणी आल्याने गावाशी काहीवेळ संपर्क तुटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आष्टी तालुक्यातील सुरुरी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर जिल्हाभरात एक डजनवर जनावरे ठार झाल्याचे समजते. यादरम्यान केज, बीड, आष्टी, शिरूर, पाटोदा व अंबाजोगाई येथून नुकसानीचे वृत्त प्राप्त झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने बीड जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता.
मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी आकाश अंशतः ढगाळ असले तरी पाऊस पडला नाही. मात्र, आज शनिवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हापासून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला. बीड, आष्टी आणि केजमध्ये वीज कोसळली; एक ठार बीड तालुक्यातील तिप्पटवाडी परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला.
दरम्यान, शेतकरी आनंद नामदेवराव शेंडगे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यावर वीज कोसळल्याने दोन बैल जागीच ठार झाले. तर, आष्टी तालुक्यातील सुरुरी येथे वीज पडून महादेव गर्जे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केज तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. दरम्यान तालुक्यातील विडा व बोरगाव परिसरात मध्यम पावसासह गारपीट झाली. तर देवगाव येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या -मुंडे, क्षीरसागर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे.