सीएस डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आपल्या न्याय मागणीसाठी आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले होते. मात्र, अत्यावश्यक आरोग्य सेवांना बाधा येऊ नये यासाठी प्रशिक्षणार्थी परिचारिकांची नेमणूक करुन सेवा सुरळीत ठेवत अत्यावश्यक शस्त्रक्रीयाही सुरुच होत्या. आता संपानंतर पुन्हा जिल्हा रुग्णात विविध शस्त्रक्रीयांची संख्या वाढली असून नऊ दिवसांत २१५ शस्त्रक्रीया झाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात नियमित तपासण्या, उपचार व शस्त्रक्रीयांसाठी गरीब व गरजू रुग्ण जिल्हाभरातून येत असतात. रोज एक हजारांहून अधिक रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात विविध तपासण्या केल्याज जातात. तर, ३२० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात रोज पाचशेंहून अधिक रुग्ण ॲडमिट असतात असे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.
मागच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपात जिल्हा रुग्णालयातील व अधिनस्त उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका तसेच कर्मचारीही आपल्या न्याय मागणीसाठी सहभागी झाले होते. या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींची आरोग्य सेवेसाठी नेमणूक केली होती. यामुळे प्रसुती, सिझेरिअन, अपघाती रुग्णांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रीया यावर कुठलाही परिणाम झाला नाही. आता संप संपल्यानंतर रुजू झालेल्या परिचारिका, लागलीच जिल्हा रुग्णालयाची सेवा संपूर्णत: पूर्वपदावर आल्याची माहिती डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

दिनांक २१ मार्च पासून दिनांक २९ मार्च या ९ दिवसांत जिल्हा रुग्णालयात तब्बल २१५ शस्त्रक्रीया झाल्याची माहिती, डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. नियमित प्रसुतींची संख्या वाढली असून सिझेरिअनची संख्याही वाढल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले. जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांतील वैद्यकीय अधिकारी व विशेतज्ज्ञ गंभीर आजारांवरील दुर्धर आजारांवर उपचार, किचकट शस्त्रक्रीया करत असल्याचेही डॉ. साबळे यांनी नमूद केले. यामध्ये तब्बल १६७ मोठ्या शस्त्रक्रीया असून ४८ लहान शस्त्रक्रीयांचा समावेश आहे. सिझेरिअन, हाडांच्या शस्त्रक्रीया, आतड्याच्या शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत.
संप मागे घेताच कर्मचाऱ्यांचे जोमात काम
दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करावी या आपल्या न्याय मागणीसाठी संपात सहभागी झालेले कर्मचारी संप मागे घेण्याची घोषणा होताच सायंकाळच्या सत्रापासून कर्तव्यावर रुजू झाले. पुन्हा त्यांनी जोमाने काम सुरु केल्याने आरोग्य सेवा पुर्वपदावर येऊन शस्त्रक्रीयांत वाढ झाल्याचे डॉ. सुरेश साबळे यांनी नमूद केले.
