धारुर तालुक्यातील ग्रामसेवकाविरूध्द गुन्हा दाखल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे मंजूर असलेल्या शेतातील जलसिंचन विहीरीचे अंतीम देयक अदा करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ग्रामसेवकावर सोमवारी (दि.20) धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे जुनी पेंशन साठी मागील आठवडाभर जनतेला वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकाने दूसरीकडे वरकमाई साठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला.
धारुर तालुक्यातील गावंदरा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आरोपी लोकसेवक राजाभाऊ मधुकर मुंडे यांनी कथित स्वरूपात तक्रारदारांच्या वडिलांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर जलसिंचन विहीरीचे अंतिम देयकाचा 98 हजार 400 रुपयांचा धनादेश देण्यासाठी पंचासमक्ष 15 हजार रु पये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड अंती 10 हजार स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदाराने पुढील कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी फिर्यादी होवून तक्रार दिली.
या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड चे पोलिस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत पोलिस अंमलदार सुरेश सांगळे, भरत गारदे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, सत्यनारायण खेत्रे, चालक अंमलदार गणेश मेहत्रे यांनी केली.