जुन्या पेन्शन संदर्भात खा.शरदचंद्रजी पवार यांची भेट घेणार
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : जुन्या पेन्शन संदर्भात राज्यातील 18 लाख जास्त कर्मचारी संपावर असून ही त्यांची रास्त मागणी आहे असे मला वैयक्तिक वाटते यासंदर्भात मी एक शिष्टमंडळ घेऊन देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब, विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत हजर झालेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे. या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी सर्व राज्य व जिल्हा सरकारी संघटनेच्या वतीने शासनस्तरावर निवेदन देणे, काळ्या फिती लावू कामकाज करणे, एकदिवसीय सामुहिक रजा अंदोलन करणे, मोर्चा काढणे इत्यादी प्रकारचे आंदोलन करूनही शासनाने जुनी पेन्शनच्या मागणीवर आजतागत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ राज्य व जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14.03.2023 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही कर्मचारी यांची अत्यावश्यक व जिव्हाळ्याची मागणी असल्याने मंगळवारी दि. 14.03.2023 पासुनच्या सर्व राज्य व जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सर्व शासकीय कर्मचारी सहभागी असून मी विधानसभा सदस्य या नात्याने माझ्यावतीने पाठिंबा असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
मला अतिरिक्त पेन्शन नको
पेन्शन हा अधिकार आहे, कर्मचाऱ्यांच्या सोबत न्याय झालाच पाहिजे. काल समाज माध्यमातून समोर आलेली चर्चा पाहता अनेकांना वाटते की, लोक- प्रतिनिधीस दिली जाणारी पेन्शन देऊ नये, मुळात लोकप्रतिनिधी यांना मिळणारे वेतन आणि पेन्शन हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही, मात्र आर्थिक समतोल असावा या भूमिकेचा मी आहे. एक लोकप्रतिनिधी एकापेक्षा अधिक वेळा निवडून आल्या नंतर जी पेन्शन मिळते ती मी नाकारत आहे, या संदर्भात जी काही कार्यलयीन पद्धत असेल त्यान्वये आपण आपली अतिरिक्त पेन्शन नाकारत असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी कळविले आहे.