एकूण 403 विद्यार्थ्यांना अंतिम यादीत स्थान, 34 विद्यार्थी हे पहिल्या शंभरात
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु. 25,000/- प्रत्येकी अर्थसाहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु. 25,000 /- प्रत्येकी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 20-10-2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 439 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र 437 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करिता प्रत्येकी रु. 25,000/- इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेचा निकाल दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाला आहे. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 437 विद्यार्थ्यांपैकी 403 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत यश मिळाले आहे. त्यातील 216 विद्यार्थी इतर मागासवर्ग, 39 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती – ब वर्गातील 23 विद्यार्थी, भटक्या जमाती – क मधील 70 तर भटक्या जमाती – ड मधील47 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे तसेच ८ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना देखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप
बीड : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर, यांच्या मार्फत बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते जेईई, नीट, एमएचटी-सीईटी ची तयारी करणार्या व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात 314 टॅबचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी जगदाळे, जि.प.चे अति. मुख्य कार्य. अधिकारी वासुदेव सोळंके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचा सत्कार सहा. आयुक्त रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे गायन घेण्यात आले. या प्रसंगी वासुदेव साळुंके, जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.