मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रार; राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली दखल
By MahaTimes ऑनलाइन |
पुणे : महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर दयनीय अवस्थेत काम करत असुन त्यांच्या मानवी हक्कांचे तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रार महाराष्ट्रातील 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने अॅड. विकास शिंदे व सहकाऱ्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाखल तक्रारीची दखल आयोगाने घेतली आहे.
एसटी महामंडळ बरखास्त करून त्याचे विलिनीकरण सरकारमध्ये करण्यात यावे, एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, तसेच पगारवाढ व्हावी या त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सन 2021 मध्ये बेमुदत संप पुकारला होता. संपादरम्यान, एसटीचे कर्मचारी ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासोबत चर्चा करताना तसेच आगारातील मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली असता एसटी कर्मचारी दयनीय अवस्थेत काम करत असल्याचे दिसून आले होते.
प्रवाशांना योग्य प्रवास सुविधा देऊनही कर्मचाऱ्यांना कामाच्या बदल्यात मिळणारा तुटपुंजा पगार ही त्यांची खूप मोठी समस्या आहे. ड्रायव्हर, कंडक्टरच्या कामाच्या निश्चित अशा वेळा ठरविण्यात आलेल्या नसल्यामुळे, अवेळी त्यांना कोणत्याही ठिकाणी जाण्यास सांगितले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानिसक आरोग्यावर होतो. याच सर्व कारणांमुळे नैराश्येतून आजपर्यंत असंख्य एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे जीवन संपविले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांच्या कामाची पद्धत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मानवीहक्कांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदरची तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली होती.