विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा घणाघात
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आम्हाला आणि आमच्या शिवसैनिकांना सत्तेचा गैरवापर करून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या ताकदीने आम्ही उभे राहत आहोत. दिल्लीवाल्यांची चाकरी करून धनुष्यबाण उचलणे सोपे नसते. धनुष्यबाण उचलायला ताकद लागते, विचार लागतो असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमध्ये बोलताना केला.
राज्यात सुरू होणार्या शिवगर्जना यात्रेच्या अनुषंगाने लातूरकडे जात असताना बीडमध्ये पदाधिकार्यांशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संवाद साधला. तोच जोश, तोच उत्साह शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकार्यांमध्ये दिसून आला. संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. सत्तेचा गैरवापर करून तमाम शिवसैनिकांना वेदना दिल्या जात आहेत. तळवे चाटून धनुष्यबाण मिळवता येतो पण उचलता येत नसतो. धनुष्यबाणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. तो रामाचा की रावणाचा, कृष्णाचा की कंसाचा हे महत्वाचे असते आणि ते उचलण्यासाठी मोठी ताकद आणि विचार लागतो.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना दानवे म्हणाले, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूसही असुरक्षित आहे. आमचे नेते खासदार संजय राऊत वेळोवेळी अन्यायाच्या विरोधात भूमिका मांडतात म्हणून त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्यांना जेलमध्ये टाकले तरीही ते शरण येत नाही आणि ऐकत नाही म्हणून आता त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचे काम गद्दार करत आहेत. एकीकडे खासदार संजय राऊत यांना धमक्या दिल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपण असुरक्षित असल्याचे बोलत आहेत. आमच्या आमदार सातवताई यांच्यावर हल्ला केला जात आहे. गद्दार आणि सरकार कोणासाठी काम करत आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
काळ परिक्षेचा आहे,यश नक्की मिळेल शिवसैनिकांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत होते. ते म्हणाले, आपल्यासाठी काळ परिक्षेचा आहे. काळजी करण्याचे काम नाही. संकटं येत असतात, या संकटातून तो तग धरतो त्याचाच विजय होत असतो. आज लाखो लोक आपल्या पाठिशी खंबीर उभे आहेत. पक्षाला पुन्हा चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे महत्वाचे नाही. आपली निष्ठा आणि आपला कणखर बाणा आपल्याला तारून नेणार आहे. गद्दार गेल्याने खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत. संकटामध्येही आपण संधी शोधण्याचे काम करू. नक्कीच यात आपण सर्व यशस्वी होऊ असे ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, बप्पासाहेब घुगे, गणेश वरेकर, नितीन धांडे, दिलीप गोरे, परमेश्वर सातपुते, संगिता चव्हाण, सुशिल पिंगळे, सुनील अनभुले, किशोर जगताप, भाऊसाहेब लटपटे, शेख निजाम, सुनील सुरवसे, गोरख सिंगण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.