अहमदनगर-पुणे महामार्गावरील कारेगाव नजीक झाला भीषण अपघात; पाटोदा तालुक्यातील डोमरीत शोककळा
By MahaTimes ऑनलाइन |
पुणे/बीड : अहमदनगर-पुणे महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथे उभ्या कंटेनर वर कार जोरात आदळली. यात सोनदरा गुरुकुल संस्थेचे संचालक सुदाम भोंडवे सह कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मयतात 4 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

यामध्ये, सुदाम शंकर भोंडवे (वय 66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय 60), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय 32) व आनंदी अश्विन भोंडवे (वय 4 वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अश्विन सुदाम भोंडवे (वय 35) हे या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते आपले आई-वडील, पत्नी व मुली सह इंडिका कार (एमएच 12 ईएम 2978) चाकण कडे चालले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (एमएच 43 बीजी 2776) वर त्यांची कार आदळली. अपघातानंतर अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचुर झाला.यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर, अश्विन हे गंभीर जखमी झाले. यात आई-वडील आणि चार वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. पत्नी कार्तिकी भोंडवे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी अहमदनगरमधील रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरचा चालक बबलू लहरी चौहान (उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
