सभागृहाच्या कामकाजाचं चित्रीकरण करणं महागात पडलं
By MahaTimes ऑनलाइन |
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्विरत कामकाजाकरिता निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजाचं चित्रीकरण केल्याबद्दल सभापती धनखड यांनी आज (शुक्रवार) ही कार्यवाही केली.
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खा. पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले, आज ट्विटरवर या सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. मी त्याचा गांभीर्यानं विचार केला आणि आवश्यक ते सर्व केलं. तत्त्वानुसार आणि संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही बाहेरील एजन्सीचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग मागता येणार नाही, त्यामुळं पाटील यांना निलंबित करण्यात येत आहे.
आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलो आहोत. सभागृहातला हा अपमान सहन करणार नाही, उर्वरित अधिवेशन काय, पूर्ण टर्म निलंबित करा हवं तर अशी प्रतिक्रि या रजनी पाटील यांनी कारवाईनंतर दिली.