मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गावात रस्त्याचे काम आठ वर्षांपासून रखडले आहे, आरोग्य सुविधा नाहीत, त्यामुळे अशोक शिवाजी माने (34, रा. वाहिरा ता. आष्टी) याने शहरातील बालेपीर भागातील चाऊस गल्लीत मोबाइल टॉवरवर चढून 6 फेब्रुवारी रोजी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन साडेतीन चार तास चालले. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर तरुण टॉवर वरून खाली उतरला.
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील झांजेवस्ती, तरटे वस्ती, भवरवाडी या परिसरातील रस्ता अत्यंत खराब आहे. खराब रस्त्यामुळे एकदा शालेय विद्यार्थ्यांचा अपघातसुद्धा झाला होता. सदरील वस्त्यांवर सिमेंट रस्ता करावा, अशी मागणी अशोक शिवाजी माने (वय 35) हा तरुण सातत्याने करत होता. 28 जानेवारी रोजी आष्टी तहसील कार्यालयासमोर या तरुणाने आंदोलन केले होते. विशेष करून मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना त्याने निवेदन दिले होते. इतकं सगळं करूनही आपल्या मागण्यांकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहून सदरील तरुण
आज सकाळी बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसला. शोले स्टाईल आंदोलन त्याने सुरू केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले होते. अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले होते. तरुण उंचस्थळी जावून बसल्याने प्रशासकीय अधिकार्यांना तिथपर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, सकाळी 11 वाजेपासून दुपारी तीन पर्यंत सुरू होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर युवकाने आपले आंदोलन मागे घेतले.