जबरी चोरी दरम्यान आरोपितांनी पती-पत्नी, बाळंतीण मुलीचा केला होता खून
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत एका खाजगी बँकेचे प्रमुख वसुली अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी ऑगस्ट 2017 दरम्यान झालेल्या जबरी चोरी दरम्यान आरोपितांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची निर्दयीपणे हत्या करून दोन मुलींवर हल्ला केला होता. उपचारादरम्यान बाळंतीण मुलीचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गेवराई शहरातील गणेश नगरातील सरस्वती कॉलनीतील रहिवाशी असलेले बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय 50) हे राहतात. 24 ऑगस्ट 2017 रोजी पहाटे चोरट्यांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी आदिनाथ घाडगे व अलका घाडगे (42) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यानंतर बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (22) व स्वाती घाडगे (18) या दोन्ही मुलींवरही हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी गर्भवतीचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता.
याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी सदर प्रकरणाचा तपास करीत आरोपी सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता. गेवराई, हमु. अचानकनगर, गेवराई) व लखन प्रताप भोसले (रा. कौडगाव घोडा ता. परळी) यांना अटक केली होती.
दरम्यान आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. अजय राख यांनी बाजु मांडली. यावेळी कोर्टाने 22 साक्षीदारांची तपासणी केली. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपितांना काल 16 जानेवारी रोजी दोषी ठरविले आज 17 जानेवारी रोजी शिक्षा ठोठावली. या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.