मुंडेंच्या छातीला किरकोळ मार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने धनजंय मुंडे यांच्या कारला मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास परळीतील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री अपघात झाला. यामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या अपघातनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर मुंडे यांनी आपल्या या अपघाताची माहिती फेसबुकवर दिली आहे. अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी लातूरहून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोक्याला गमजा, अंगावर शाल पांघरून ते लातूरकडे रवाना झाले. तेथून ते मुंबईला पोहचतील. तेथे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली.
