बीड मध्ये भव्य व्यसनमुक्ती रॅली; घोषणांनी बीड शहर दणाणले
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : स्व. विनायक मेटे यांनी 2015 साली व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मात्र, काही कारणास्तव कार्यक्रमास हजर राहु शकलो नाही. आज आलोय, पण मेटे साहेब आपल्यात नाहीत. आज मेटेंची कमतरता पदोपदी जाणवते समाजासाठी त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य खर्चि घातलं. मराठा आरक्षण, व्यसनमुक्त समाज, शिवस्मारका स्वप्नपूर्तीसाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज 31 डिसेंबर रोजी वर्ष अखेरीस स्व. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्यावतीने व्यसनमुक्त बीड अभियानांतर्गत व्यसनमुक्ती महारॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. ज्योती विनायक मेटे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, भिमराव धोंडे, कुंडलिक खांडे, तानाजी शिंदे, राजन घाग, प्रभाकर कोलंगडे, सीए. बी. बी. जाधव, आशुतोष मेटे, रामहरी मेटे, नारायण काशिद यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले की, 2015 साली मेटेंनी व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. व्यसनमुक्तीसाठी मोठी रॅली आणि कार्यक्र म करायचा असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. 31 डिसेंबरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनं यांची पार्टी केली जात असून, याचा तरु ण पिढीवर विपरित परिणाम होत आहेत. तरुणांना आपल्याला व्यसनापासून दूर ठेवायचं आहे. नववर्षाचं स्वागत करताना दारु नाही तर दूध पिउन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मेटे म्हणाले होते,’असे ही फडणवीस यांनी सांगितले.
ज्योती मेटे यांनी म्हटले की, विनायक मेटेंचा पिंडच समाजकारणाचा होता, ते समाजकारणात झोकून देत. प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी हे सिद्ध करून दाखवले. 2017 पासून व्यसनमुक्तीवर काम सुरु केली. ती मोहीम नंतर व्यापक होत गेली. हाच विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आहोत असेही श्रीमती मेटे म्हणाल्या.
व्यसनमुक्ती ‘ज्योती’ला हजारो बीडकरांची साथ; घोषणांनी दणानुन गेले बीड शहर
बीड : उभी हयात सामाजिक प्रश्नांवर लढण्यात घालविणाऱ्या दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले. अनेक वर्षांपासून त्यांनी चालविलेली व्यसनमुक्तीची चळवळ आता त्यांच्या पत्नी डॉ. ज्योतीताई मेटे यांनी हाती घेतली आहे. कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून शनिवारी (दि. ३१) शहरातून भव्य व्यसनमुक्ती जनजागृती फेरी निघाली. जणू विनायकरावांच्या व्यसनमुक्तीच्या ‘ज्योती’ला हजारो बीडकरांनी साथ दिली. येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल येथून डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती फेरीला सुरुवात झाली.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल येथून निघालेली फेरी सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पोचली. ‘मद्यपान संसाराची धुळधाण’, ‘व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी’, ‘घ्याल तंबाखुची साथ’, ‘आयुष्य होईल बरबाद’, अशा विविध घोषणांनी परिसर दणानूण गेला. परिचर्या महाविद्यालये, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, तरुण, समाजातील विविध घटकांतील नागरिकांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सहभागींच्या हाती घोषणांचे फलक होते.
जिल्हा शल्यचिकित्सक तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीचे डॉ. सुरेश साबळे यांनी फेरीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, शिवसंग्राम युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, अशुतोश मेटे, प्रतिष्ठानचे सचिव सुहास पाटील, वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, शेख निझाम, शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, शहराध्यक्ष राहूल मस्के, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक, नितीन कोटेचा, सी. ए. बी. बी. जाधव, प्राचार्य डॉ. सविता शेटे, इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे, कुंदाताई काळे, मनोज जाधव, सचिन कोटुळे, शेख अखिल, शेषेराव तांबे आदींसह प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.