आरोग्य मंत्री सावंत यांचा विद्यार्थी हिताचा निर्णय – डॉ. सुरेश साबळे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकिय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे यंदापासून ३५ ने वाढ झाली आहे. आता एएनएम या परिचर्या सर्टिफिकेट पदवीची विद्यार्थी प्रवेश क्षमता २० वरुन ४० आणि जीएनएम या परिचर्या पदविकेची प्रवेश क्षमता २० वरुन ३५ झाली असल्याची माहिती, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या या परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी संख्या वाढविण्याबाबत आरोग्य मंत्री तानाजी तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र परिचर्या परिषदेला पाठविला होता. सोमवारी (दि. १९) महाराष्ट्र परिचर्या परिषदेने मान्यता दिल्याचेही डॉ. साबळे म्हणाले.
जिल्हा रुग्णालयात मागच्या बाजूला स्वतंत्र इमारतीमध्ये शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या ठिकाणी पुर्वी एएनएम (ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी) या सर्टीफिकेट कोर्सच्या प्रशिणासाठी २० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती. तसेच जीएनएम (जनरल नर्सींग अँड मिडवायफरी) या परिचर्या पदविकेसाठी देखील विद्यार्थी प्रवेश क्षमता २० होती. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेमुळे परिचर्येचे विविध प्रशिक्षण शिक्षण काळातच अगदी उत्तम पद्धतीने शिकता येतात. त्यामुळे या ठिकाणचा निकाल देखील नेहमी चांगला लागत असते. अद्यायवत प्रशिक्षण केंद्रासह या ठिकाणी ८० खोल्यांचे उत्तम वसतीगृह देखील आहे. या ठिकाणचे प्रवेश महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नियमानुसार प्रवर्गनिहाय दहावी व १२ वीतील गुणांच्या मेरीटने होतात, असेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले.

येथील डाॅ.संतोष शहाणे, प्राचार्य डॉ. सुवर्णा बेदरे, मुख्य अधिसेवीका रमागिरी, सोनाली देशमुख आदींच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चाललेल्या या परिचर्या प्रशिक्षण केंद्राची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याची होती. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढते रुग्णालये व शिक्षणाच्या विविध संधींसाठी येथे प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणी आम्ही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे सांगीतले होते. यानुसार महाराष्ट्र परिचर्या परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. प्रवेश क्षमता वाढविण्यासाठीच्या संपूर्ण अटींची पुर्तता करुन सर्व कागदपत्रे सादर केली होती. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा, स्टाफ याबद्दल माहिती दिली होती.
आता एएनएम या परिचर्या सर्टिफिकेट पदवीची विद्यार्थी प्रवेश क्षमता २० वरुन ४० आणि जीएनएम या परिचर्या पदविकेची प्रवेश क्षमता २० वरुन ३५ झाली आहे. त्यामुळे आता दरवर्षी दोन्ही सर्टीफिकेट व पदविकेच्या विद्यार्थ्यांची एकूण क्षमता ७५ असेल. विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहितीही डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
