केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांची वसंत मुंडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
बीड : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांनी बीडच्या दौर्यावर असताना आपले अनेक वर्षांपासुनचे मित्र पत्रकार वसंत मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. सुरुवातीच्या काळातील आठवणींना ऊजाळा देत मुक्त संवाद साधत मैफिलच रंगली. यावेळी मुंडे, कराड, सावे यांच्यातील दिलखुलास मैत्री अनुभवायला आली. सार्वजनिक जीवनात अलिकडे टोकदार होत असलेल्या भूमिका आणि राजकारणात विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर वैयक्तिक मैत्री जपण्याचे प्रकार अपवादानेच पहायला मिळतात ते दिसुन आले.

बीड येथे शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे आले होते. कार्यक्रमानंतर दोघांनीही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. मागील वीस वर्षात वसंत मुंडे यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे. तर डॉ.कराड, सावे यांनीही राजकीय क्षेत्रात विशिष्ट उंची मिळवली आहे. कराड आणि सावे यांची राजकीय कारकीर्द आणि मुंडेंची पत्रकारीतेची सुरुवात समकालीनच.
वसंत मुंडे बीडमधून पत्रकारीता करत असले तरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सुरुवातीलाच संपर्क राहिला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख या दिग्गजांसह राज्यभरातील पत्रकारीता क्षेत्रातीलही नामवंतांशी संपर्क आल्यानंतर त्यांनी पत्रकारीतेच्या पुढे जाऊन मैत्रीचा घट्ट धागा निर्माण केल्याचे अनेकदा दिसुन आले. योगायोगाने कराड, सावे आणि मुंडे आपआपल्या क्षेत्रात एका विशिष्ट उंचीवर पोहोचले असले तरी तिघांनीही वैयक्तिक मैत्रीवर कुठेही परिणाम होऊ न देता आपले संबंध कायम ठेवल्याचे बीडकरांना अनुभवायला आले.
सार्वजनिक जीवनात राजकीय भूमिका अलीकडे टोकदार होत असल्याने वैयक्तिक पातळीवरील सहजता कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसते. तर राजकीय क्षेत्रात विशिष्ट उंची गाठल्यानंतर नेत्यांचे दौरे, भरगच्च कार्यक्रमामुळे घाई गडबडीत पार पडतात. त्यामुळे इच्छा असुनही वैयक्तिक मैत्री असणार्यांना भेटणे आणि ऋणानुबंध जोपासणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मुंडे, कराड आणि सावे यांच्या भेटीने सार्वजनिक भूमिकांच्या पलीकडच्या दिलखुलास मैत्रीचे उत्कट दर्शन झाले.
‘वृत्तपत्रांचे अर्थकारण’ पुस्तिका भेट
वृत्तपत्रांचे अर्थकारण या विषयावर वसंत मुंडे यांनी केलेल्या चिकित्सक अभ्यासाची पुस्तिका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड व सहकार मंत्री सावे यांना देण्यात आली. त्यावेळी दोघांनीही पत्रकारीता क्षेत्रातील वसंत मुंडे यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी संपादक संतोष मानूरकर उपस्थित होते.
