बीड जिल्हा संघाची पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय चौदा वर्षातील क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याच्या संघात बीडच्या आदर्श क्रिकेट क्लबचे १५ पैकी ९ खेळाडुंचा समावेश आहे. आज झालेल्या नंदूरबारसोबतच्या सामन्यात आदर्श क्रिकेट क्लबच्या खेळाडुंनी आपला दबदबा निर्माण केला.
नाशिक येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय चौदा वर्षाआतील क्रिकेट स्पर्धासाठी बीड जिल्हा संघात १५ पैकी आदर्श क्रिकेट क्लबच्या ९ खेळाडुंची निवड करण्यात आली. या ९ खेळाडुंमध्ये व्यंकटेश हुरकुडे, ओम सानप, श्रवण गालफाडे, श्रेयस बडे, पृ्थ्वी पाळणे, कृष्णा गायकवाड, राजन कवठेकर, शौर्य जाधव, समर्थ गव्हाणे यांची निवड झाली. आदर्श क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आदर्श क्रिकेट क्लबचे कर्णधार किशोर जगताप, प्रशिक्षक शेख अझहर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सोमवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात बीड जिल्हा संघाने चमकदार कामगिरी केली. नंदूरबारसोबत झालेल्या या सामन्यात आदर्श क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी आपला दबदबा निर्माण केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना नंदूरबारचा संघ अवघ्या ३९ धावात गारद झाला. यात आदर्श क्लबच्या श्रेयस बडे याने दोन ओव्हरमध्ये एक ओव्हर मेडन टाकत तीन विकेट पटकावल्या तर दुसर्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एक विकेट मिळवली. व्यंकटेश हुरकुटे यानेही आठ धावा देत एक विकेट पटकावली.
नंदूरबारचा संघ ३९ धावात गारद झाल्यानंतर बीडच्या संघाने दमदार सुरूवात केली. तब्बल ३०२ धावा चोपून काढल्या. यात व्यंकटेश हुरकुटे याने अवघ्या ७० चेंडूत १४ चौकार आणि एक षटकाराच्या साहय्याने ९३ धावा काढल्या. तर श्रावण गालफाडे याने ५२ चेंडूत ९ चौकार ठोकत ५३ धावा काढल्या. दुसर्या डावात नंदूरबारची एक विकेट घेण्यात बीडला यश मिळाले.