तळेगाव शिवारात 200 एकर जागेत इज्तेमा, 1.5 लाखांवर लोक हजेरी लावणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहर परिसरातील तळेगाव शिवारात जवळपास 200 एकर जागेत तब्लिग जमात चा 8, 9 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय इज्तेमा संपन्न होणार आहे. या दोनशे एकर पैकी 20 एकरांत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यात साधारण दीड लाख लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तब्लीगी इज्तेमास गुरूवारी (दि. 8) रोजी पहाटे फजर नमाज नंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरूवात होणार आहे. जिल्हाभरातील 1.5 लाखांवर भाविक या तबलिग जमातच्या इज्तेमाला हजेरी लावणार आहेत.

कोरोनामुळे इज्तेमास दोन वर्षांत खंड पडला होता. आता राज्यात जिल्हानिहाय इज्तेमा सुरू झाले आहेत. बीड-अहमदनगर महामार्ग लगतच्या तळेगाव, पिंपरगव्हाण व काकडहिरा या तीन गावच्या शिवारात शेतक-यांनी 200 एकर जमिन उपलब्ध करून दिली आहे. यात विशेष बाब ही कि जवळपास ऐंशी टक्के शेत जमीन हिंदू बांधवाची आहे.

मागील एक महिण्यापासुन पाच हजार स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. दरम्यान जमिनीचे सपाटीकरण, मंडप, पार्किंग, हॉटेल्स, रु ग्णालय, वजूखाने, स्वच्छतागृहांची उभारणी झाली आहे. इज्तेमा स्थळी येण्यासाठी रस्ते आणि दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली, पुणे येथील मौलानांचे मार्गदर्शन होणार आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय लोकांची बसण्याची व्यवस्था असेल. मंडपमधील शेवटच्या व्यक्तीस बयान स्पष्टपणे ऐकू येईल, असे स्पीकर लावले आहेत. गुरूवार, शुक्रवार असे दो दिवस दहा हजारांवर स्वयंसेवक भाविकांच्या मदतीसाठी तैनात राहणार आहेत. इज्तेमाच्या परिसरात भाविकांसाठी फक्त 50 रूपयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाचे एकुण 15 झोन असणार आहे. याशिवाय चहा-पानी ची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. इज्तेमाच्या दरम्यान जवळपास 100 जोडप्यांचा सामूहिक निकाह लावण्यात येईल. दरम्यान विवाह समारोहातील हुंडा व अनिष्ट प्रथेला संपुष्टात आणावे असे मार्गदर्शन करण्यात येईल.
इज्तेमाचा समारोप शुक्र वारी (दि. 9) रोजी सायंकाळी मगरीब ची नमाजनंतर शेवटचे बयान होईल त्यानंतर सामुहिक दुआ ने इज्तेमाचा समापन होणार आहे. इज्तेमाच्या समारोपानंतर जिल्हाभरातून इस्तेमाह येथे दाखल झालेल्या एक हजारावर ‘जमात’ 4 महिणे, 40 दिवसांकरिता येथून मार्गस्थ होतील.
सर्व सोयी-सुविधा उपलब्ध
इज्तेमाच्या चारही बाजूने तीन झोनसाठी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, अवजड वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र सोय. राहणार आहे. बीड शहर ते तळेगाव दरम्यान एक हजारावर हजार स्वयंसेवक लोकांना मदत करतील. जेवणासाठी एक झोनला पाच या प्रमाणे 15 झोन राहतील. फक्त 50 रुपयांत जेवण मिळेल. याशिवाय इस्तेमागाह परिसरात व्यापाºयांचे 150 पेक्षा अधिक लहान हॉटेल्स उभारण्यात येत आहेत. 2 हॉस्पिटल, मेडीकल व रुग्णवाहिका तैनात राहील, त्याशिवाय प्रत्येकी 5 लाख लिटर क्षमतेचे 3 शेततळे, विहिरी आणि 20 पेक्षा अधिक टँकरची सोय. महावितरणकडून चार रोहित्र घेतले आहेत. याशिवाय जनरेटची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. इज्तेमासाठी येणा-या भाविकांच्या वाहनांची दुरुस्ती मोफत करण्यात येणार आहे. यासाठी मेकॅनिकची टीम तैनात राहील.
