निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी
By MahaTimes ऑनलाइन |
पुणे : कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात बटाटा शेतीत एका झाडाला जमिनीच्या वरती चक्क टोमॅटोप्रमाणेच झाडाच्या फांदीला बटाटे लगडलेत. बटाटे जमिनीत येतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र बटाटे झाडाच्या फांदीलाच लगडलेले दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या बटाटाच्या झाडाला चक्क 18 ते 19 बटाटे लगडले आहेत. बटाट्याच्या झाडाला जमिनीत बटाटे येतात. परंतु येथे मात्र जमिनीवरील झाडाला बटाटे आल्याने कुतुहलाचा विषय झाला आहे. बटाटा हे कंदमुळं आहे, अशीच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हे बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटल ना.. पण खर आहे. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. मेंगडेवाडी येथील माळरानावर संदीप आणि धनेश वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी पुखराज जातीच्या बटाटा वाणाची खरेदी मंचर बाजार समिती आवारातील मोरे ब्रदर्स संजय मोरे याच्याकडून घेऊन बटाटा लागवड 90 दिवसापूर्वी केली आहे.
सध्यस्थितीत बटाटा पीक काढणीला आलेले आहे. सरासरी 50 किलो बटाटा वाणाची लागवड केल्यानंतर सुमारे 15 बटाटा गोणी म्हणजे 900 किलो बटाट्याचे उत्पादन झाले. सरासरी 200 रुपये 10 किलो बाजारभावाने बांधावर येऊन व्यापारी बटाटा खरेदी करत आहे. अंतिम टप्प्यात बटाटा पिकाचे पाला काढण्याचे काम सुरू आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या बटाटा पिकातील एका झाडाला चक्क बटाटे लगडलेले दिसून आले.
हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत असताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क जमिनीच्या वर आल्याने त्यांना आश्चर्य वाटले. तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत.