लोखंडे कुटुंबातील कर्त्या भावंडावर काळाचा घाला
By MahaTimes ऑनलाइन |
औरंगाबाद : कंपनीत कामासाठी चाललेल्या दुचाकीस्वार तिघा भावंडाना भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघे बहिण-भाऊ ठार झाले. हा भिषण अपघात आज गुरुवारी सकाळी वाळूज उद्योगनगरीतील मान एनर्जी सोल्युशन या कंपनीसमोर घडला.

कमळापूरच्या ओमसाईनगरात वास्तव्यास असणारे दीपक कचरु लोखंडे (२०), मोठी बहिण अनिता (२२) व लहान बहिण निकीता उर्फ राणी (१८) हे तिघे वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. दीपक हा महेश एंटरप्रायजेस तर अनिता व निकीता या दोघी रेणुका आॅटो या कंपनीत काम करतात. आज गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दीपक याने दुचाकी (क्रमांक एम.एच.२१, ए.एम.६९९५) बहिणी अनिता व निकीता यांना सोबत घेऊन तिघेही कंपनीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. रांजणगाव फाट्यावरुन कंपनीकडे जात असतांना एनआरबी चौकालगतच्या मान एनर्जी सोल्युशन या कंपनीच्या समोर साजापूर-करोडीच्या दिशेने जाणाºया ट्रक (क्रमांक एम.एच.०४, एफ.जे.५२८८) च्या चालकाचा दुचाकीला धक्का लागला. या धक्याने दुचाकीस्वार दीपक याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटुन तिघेही बहिण भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून चिरडले गेले. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने या तिघा भावंडाचा घटनास्थळी चेंदा-मेंदा झाला होता.
या अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोकॉ.संजय बनकर,वाहतुक शाखेचे देवीदास दहिफळे, रांजणगावचे माजी उपसरपंच अशोक शेजुळ, रामचंद्र पाटील, रोहिदास मारकवाड, सुरेश गायकवाड, सुरेश गायकवाड यांच्या मदतीने तिघा गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून या तिघांना मयत घोषीत केले. ट्रकचा चालक अजमत शेख हबीब शेख (२६, खंडाळा, ता. वैजापूर) हा नांदेड येथुन सोयाबीन ट्रकमध्ये भरुन वाळूज एमआयडीसीतील ग्रीन गोल्ड कंपनीत माल खाली करण्यासाठी आला होता. ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावुन करोडी शिवारात असल्याने अजमत शेख हा उद्योगनगरीतुन करोडीकडे जात असतांना हा अपघात घडून यात तिघा बहिण-भावंडाचा बळी गेला. या अपघातास कारणीभुत ट्रकचालक अजमत शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपनिरीक्षक स्वाती उचित या करीत आहेत.
