सरकारने दलितांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा ‘जेलभरो’ -पप्पू कागदे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : दलित, भुमिहिन, आदिवासी, पारधी, गावकुसां बाहेरील उपेक्षित भूमिहीन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दलितांना गायरान जमीनी काढण्या संदर्भात नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु आम्ही सरकारला एक इंचही गायरान जमीन परत घेऊ देणार नाही. दलित भूमिहीन शेतमजुरांच्या 1990 पासुन ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी ह्या त्यांच्या हक्काच्या आहेत. एवढेच नव्हे तर 2010 पर्यंतच्या गायरान जमिनी देखील त्यांच्या नावे करण्यासाठी रिपाइं पाठपुरावा करत आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. सरकारने दलितांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा यापुढे जेलभरो आंदोलन केले जाईल.असा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला.
महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे. त्या अनुषंगाणे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार (ता.२३) रोजी युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली महाधरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून निघालेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवून सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
पप्पू कागदे यांनी निवेदनात म्हंटले आहे की, दलित,उपेक्षित समाज आता कुठेतरी स्थिर होवून गायरान जमिनीत कष्ट करुन सामाजिक जीवन जगू लागला आहे. आणि आता जर या लोकांच्या ताब्यातील गायरान जमिनी काढुन घेतल्या तर पुन्हा एकदा हा समाज गुलामागिरीच्या खाईत लोटला जाईल. या सर्व बाबींचा सरकारने विचार करून सुमोटो याचिके विरूध्द रिपीटीशन करावे. राज्यातील गायरान जमिनी संदर्भात रिपाइंकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. जोपर्यंत सरकार गायरान जमिनी संदर्भातील प्रश्न कायमचा सोडवीत नाही तोपर्यंत रिपाइं हा लढा सुरुच ठेवणार आहे.
या महाधरणे आंदोलनात पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली राजू जोगदंड, किशन तांगडे, भास्कर रोडे, मझहर खान, गोवर्धन वाघमारे, किशोर कांडेकर, अशोक साळवे, अविनाश जावळे, दिपक कांबळे, दशरथ सोनवणे, अरुण भालेराव, नरेंद्र जावळे, धोंडीराम सिरसाठ, लक्ष्मण सिरसाठ, अरुण निकाळजे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, बापू पवार, सुभाष तांगडे,बबन मस्के, गौतम बचुटे, सादेक कुरेशी, गणेश लांगडे, संदिप साळवे, दासू वाघमारे, दशरथ शिंदे, अविनाश जोगदंड, भगवान ससाणे, मायाताई मिसळे, राणीताई गायकवाड, रेषमाताई जोगदंड यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान अजिंक्य चांदणे, विजय चांदणे, नितीन सोनवणे, हनुमंत क्षीरसागर आदींनी पाठिंबा दिला.
येत्या ३० तारखेला जिल्हाभरात सर्व तहसिलसमोर आंदोलन
येत्या ३० तारखेला जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर रिपाइं आंदोलन करणार आहे. गायरान जमीन हा दलितांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. याचा सरकारने विचार केला पाहिजे. याची सरकार, प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा आंदोलन तीव्र होत जाईल. असा निर्वाणीचा ईशारा रिपाईने निवेदनात दिला आहे.