केवळ राजकीय तहान भागवण्यासाठी हा जयदत्त अण्णा केवीलवाना प्रयत्न – राजेंद्र मस्के
By MahaTimes ऑनलाइन |
‘हर घर जल’ ही महत्वाकांक्षी संकल्पना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीतून संपूर्ण देशभरात जलजीवन मिशन योजने अंतर्गत राबवली जात आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा फायदा संपूर्ण जिल्हाभरातील गाव खेडे वस्त्यांना होत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असताना, जयदत्त क्षीरसागर यांनी केवळ राजकीय तहान भागवण्यासाठी बीड मतदार संघातील जलजीवन मिशन मधील पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी हा केवीलवाना प्रयत्न आहे. काळ बदलला, राजकारण बदललं जयदत्त अण्णा आता जनतेला वेड्यात काढू नका. असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.
काल जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड मतदार संघातील 137 गावांची तहान भागणार अशा आशयाचे पत्रक काढून, श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. याविरुधात भारतीय जनता पार्टीने खरमरीत पत्रक काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, जलजीवन मिशन योजना 2019 पासून सुरु झाली. जिल्ह्यातील 1367 गावांचा या मध्ये समावेश असून साधारण जानेवारी 2022 पासून ई – टेंडरिंग प्रक्रिया सुरु झाली असून, काही गावांमध्ये या योजनेचे काम सुरु आहेत. दरम्यान जलजीवन मिशन मध्ये जे भ्रष्टाचाराचे कांड घडले. हे कांड जयदत्त अण्णांना दिसले नाही. जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी स्वतः या योजनेचा आढावा घेऊन योजनेतील गैरकारभारावर लक्ष वेधले.
बीड मतदार संघातील 137 गावा पैकी काही गावांचे प्रकरण न्यायालयात गेले. गावातील सामान्य कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढाई करून टेंडर रिकॉल करू घेतले. मग अण्णा सांगा या प्रक्रियेत आपण कोठे होतात? रिकॉल झालेल्या टेंडर चे श्रेय घेण्यासाठी पुढे येण्याची बुद्धी आपल्याला कशी मिळाली. सभापती, आमदार, मंत्री राहिलेल्या अनुभवी व्यक्तीकडून ही श्रेय ओरबडणारी भूमिका आपल्या व्यक्तीमत्वाला अजिबात शोभत नाही. लोक जागृत झाले आहेत. कोण कोठे केव्हा काय करतो. याची माहिती जनतेला घर बसल्या मिळते. यापुढे लोकांना गृहीत धरून राजकारणाचा प्रयत्न करू नका. खा. प्रितमताई भाजपाच्या, योजना मोदींची, सरकार शिंदे – फडणवीसांचे तुमचा संबंध येतोच कोठे ? असा सवाल ही राजेंद्र मस्के यांनी उपस्थित केला आहे.