कृती दलामार्फत धाडसत्राचे आयोजन : बाल कामगारांची मुक्तता करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बाल कामगार या अनिष्ट प्रथेतून महाराष्ट्र राज्य मुक्त करण्यासाठी बालदिन सप्ताह साजरा केला जात आहे. बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या सप्ताह कालावधीत बीड जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक व कामगार विभागाचे मंत्रीमहोदय यांच्या बैठकीतील सूचनांनूसार सप्ताह कालावधीत स्वाक्षरी मोहिम अभियान,दुकाने आणि आस्थापनाच्या ठिकाणी दर्शनी भागात बाल कामगार न ठेवण्याचे स्टिकर्स लावणे, पत्रके वाटप करणे, बीड जिल्ह्यातील हॉटेल असोशिएशन दुकाने व व्यापारी असोसिएशन, औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, कामगार संघटना यांच्या समवेत बैठकांचे आयोजन करुन बाल कामगार कामावर न ठेवण्याबाबत समुदेशन, मालकांकडून हमीपत्र भरुन घेणे अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारीत अधिनियम, 2016 अन्वये जो कोणतीही आस्थापना मालक 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय प्रक्रियेमध्ये व 18 वर्ष वयाखालील किशोरवयीन यांना धोकादायक व्यवसाय व प्रक्रीयेमध्ये कामावर ठेवतील अशा आस्थापना मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रुपये व कमाल 50 हजार रुपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. सर्व दुकाने, आस्थापना, हॉटेल, चहा टपरी, गॅरेज, वीटभट्टी, स्टोन क्रेशर आस्थापना मालकांनी बाल कामगारांना कामावर ठेवू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
कृती दला मार्फत कामगार विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्या मदतीने जिल्ह्यातील वीटभट्टी, खडीक्रेशर, हॉटेल, दुकाने, चहाटपरी, गॅरेज यावर धाडसत्राचे आयोजन करुन बाल कामगारांची मुक्तता करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.