प्रियदर्शनी शाळा निरोप समारंभात प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांचे प्रतिपादन
पाटोदा : स्व. केशरकाकु क्षीरसागर यांना तळागळातील मुलीच्या शिक्षणाची आत्मीयता होती, मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध करावे, समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी 1989 साली या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. काकूंच्या अंगी असलेल्या संघर्ष, चिकाटी आणि जिद्द या गुणांचा वारसा मुलींनी घ्यायला हवा असे प्रतिपादन नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले. त्या प्रियदर्शनी शाळा पाटोदा येथील निरोप समारंभ कार्यक्रमावेळी बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर आई संस्थानच्या मठाधिपती ह.भ.प राधाताई सानप, वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आबासाहेब हांगे, प्रियदर्शनी शाळेचे मुख्याध्यापक ढोरमारे जी.जे. यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य क्षीरसागर म्हणाल्या कि, 1989 साली केवळ अकरा मुलींना घेऊन या शाळेची सुरुवात झाली होती, शाळेच्या शिक्षकांचे परिश्रम आणि मोलाच्या योगदानावर आज चारशे पंचवीस मुली इथे शिक्षण घेत आहेत. मुलींनी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे म्हणून शैक्षणिक तसेच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्व.काकूंनी राजकीय क्षेत्रात संघर्षमय प्रवास केला, जसे काकूंनी शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी लक्ष दिले तसेच संस्थेच्या पुढील विकासासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अनेक शाळांचे मुख्याध्यापक, क्षीरसागर, पवार मॅडम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी पाटोदा पासून जवळच असलेल्या आई संस्थांन येथील आध्यात्मिक परिसराला डॉ. दीपा क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी ह.भ.प राधाताई सानप यांनी डॉ. दीपाताई क्षीरसागर यांचा सत्कार केला.
