दोघिंचे मृतदेह सापडले, तरूण बेपत्ता, शिरूर कासार तालुक्यातील हृदयद्रावक घटना
By MahaTimes ऑनलाइन |
गुरूवारी दुपारी शिरूर कासार तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान रायमोह परिसरातील भानकवाडी व दगडवाडी दरम्यान रौंद नदीला आलेल्या पुरात वाहुन गेल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. दोघींना वाचविण्याच्या प्रयत्नात एक 30 वर्षीय युवक वाहुन गेला.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. तालुक्यातील रायमोह परिसरातील भानकवाडी येथील स्वरा कुंडलीक सोनसळे (12 ) वर्षीय तर छकुली कुंडलीक सोनसळे ( 9) ह्या दोषी गुरूवारी शेतात गेल्या होत्या. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने दोघी जणी घराकडे निघाल्या. दरम्यान नदी ओलांडत असतांना अचानक आलेल्या पुरात त्या वाहून अडकल्या व बुडायला लागल्या. हा प्रकार लक्षात येताच शिरसमार्ग येथील साईनाथ भोसले याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेला.
या हृदयद्रावक घटनेची माहिती समजताच तहसिलदार श्रीराम बेंडे, पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह आढळुन आले. तर, तरूणाचा शोध सुरू आहे. दरम्यान बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख भरत जाधव व अशोक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. एन डी आर एफ ची टिम ला पाचारण करण्यात आल्याची माहिती तहसिलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.
दगडवाडी परिसरात वीज पडून शेतकरी ठार
शिरूर कासार तालुक्यात गुरूवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान दगडवाडी शिवारात रावसाहेब जायभाये (वय 55) या शेतक-याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. यावेळी ते शेतात काम करीत असतांना ही घटना घडली.