मिरवणुकीत असंख्य मुस्लिम बांधवांचा सहभाग
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जश्ने ईद मिलादुन्नबी (12 रबी-उल-अव्वल ) निमित्त रविवारी बीड शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अबाल-वृद्ध पारंपारिक पोशाखात व हातात निशान घेउन सहभागी झाले होते.

केजीएन ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद मुहम्मद जहीरुद्दीन शाह कादरी यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक शांततेच्या वातावरणात संपन्न झाली. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून ईद मिलादुन्नबी निमित्र मिरवणूक काढण्यात आली नव्हती.यंदा 12 रबी-उल-अव्वल 1444 हिजरी (9 ऑक्टोबर) रोजी प्रेषित मुहम्मद यांच्या जन्मदिनी रविवारी सकाळी पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली.

मदिना मुनव्वरा आणि काबा शरीफच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील हजरत शहेंशाहवली दर्गा येथून ही मिरवणूक निघुन शहरातील प्रमुख मार्गाने दुपारी दीड वाजता कादर पाशा मस्जिद येथे पोहोचली. आणि मिरवणुकीचे समापन करण्यात आले.

मुए मुबारकची जियारत आणि लंगर-ए-आम
मिरवणुकीच्या समाप्त झाल्यानंतर शहरातील शहेंशाहनगर येथील केजीएन मस्जिदमध्ये मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांच्या पवित्र मुए-ए-मुबारकची जियारत व लंगर-ए-आम (महाप्रसाद) चा सर्वांनी लाभ घेतला. दरम्यान मिरवणुक समयी ठिकठिकाणी शरबत व प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा लाभ सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांनी घेतला. या मिरवणुकीने प्रेषित मुहम्मद पैंगबर यांचा एकात्मतेचा संदेश दिला.
