पोलिसांवरील ताण कमी होणार : ७२३१ पद भरतीला मान्यता
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक ( किरकोळ ) रजा १२ वरुन २० इतक्या वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.
पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, पोलिसांच्या घरांचा, आरोग्याचा प्रश्न सोडवावा आणि वार्षिक किरकोळ रजांची संख्या १२ वरुन २० करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.
पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी
मुंबई : पोलिस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सध्या पोलिसांच्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.