पत्रकारिता क्षेत्रात शोककळा
By MahaTimes ऑनलाइन |
औरंगाबाद : मराठवाडयाच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवर लिखाण करत या भागातील व्यथा आणि वेदनांना पत्रकारितेच्या माध्यमातून सामोरे आणणारे ज्येष्ठ पत्रकार शेख जलील शेख समद (वय 56) यांचे शनिवारी (दि 17) दिर्घ आजाराने निधन झाले.
औरंगाबादच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी तीन दशकाहून अधिक काळ काम केले. हिंदी दैनिक औरंगाबाद सिटीजन्स मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. मराठवाडा व महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारणाची जाण असणारे शेख जलील हे औरंगाबादेतील कटकट गेट भागात वास्तव्यास होते.
औरंगाबाद सिटीजन्सच्या कार्यकारी संपादक या महत्वाच्या पदावर काम करण्याबरोबरच त्यांनी स्वत: चे लोकमान्य वार्ता नावाचे दैनिक ही समर्थपणे चालविले. जेष्ठ पत्रकार असतांना ही त्यांनी कधीही गर्व केला नाही. वृत्तसंकलन, वृत्त संपादनापर्यंतची धुरा ते सहजपणे पार पाडीत असे. ‘‘जमीन से जुडकर जो पत्रकारिता करता है,वही अपने पेशे इन्साफ कर सकता है. और पीडीत, उपेक्षित को न्याय दिला सकता है’’असे ते नेहमी म्हणत असे.
विविध पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे राजकारणातील अंदाज चुकत नसत. त्यांनी लिहिलेल्या वार्तांकनामुळे बऱ्याचदा नेत्यांची झोप उडाली होती. विश्लेषण क्षमता आणि अफाट वाचन यामुळे त्यांनी राजकीय व सामाजिक अनुषंगाने लिहिलेली वार्तापत्रे विशेष गाजली होती.
त्यांची नमाज-ए-जनाजा अरफात मशीदीत रात्री 11 वाजेच्या दरम्यान अदा करण्यात आली. तर दफनविधी अरफात मशीदीच्या परिसरात असलेल्या कब्रस्तान येथे करण्यात आला. शेख जलील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेचे कंत्राटदार शेख जावेद यांचे ते ज्येष्ठ बंधु होत. शेख परिवाराच्या दु:खात ‘महाटाईम्स’ परिवार सहभागी आहे.