महाराष्ट्र राज्य कृषी पदविका संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुलाखे यांची मागणी
By MahaTimes ऑनलाइन |
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षणात कृषी विषय घेण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून कृषी शिक्षक म्हणून कृषी पदविका धारक विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदविका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सुलाखे यांनी केली आहे.
शालेय शिक्षणापासूनच कृषी विषयाचे शिक्षण देण्यात यावे आणि यासाठी कृषी पदविका धारकांना प्राथमिक शिक्षक म्हणून तेथे नियुक्ती द्यावी अशी मागणी आम्ही 1995 पासूनच करत आलो आहोत,कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे हे आम्ही 27 वर्षांपासून सांगत आलो आहोत. तत्कालीन ग्राम विकासमंत्री आर आर पाटील यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली होती. मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला, आजही हजारो कृषी पदविका धारक विद्यार्थी बेरोजगार आहेत. आम्ही वारंवार राज्यभर आंदोलने देखील केली आहेत मात्र कुठल्याही सरकारने याकडे गंभीरपणे बघितले नाही परिणामी शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ ज्ञान नाही म्हणून इतर कोर्सकडे जाऊ लागले आहेत.
कृषी मंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे मात्र आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यापेक्षा कृषी पदविका धारकांना तेथे शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदविका विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सुलाखे यांनी केली आहे.