बीडमध्ये युवासेनेचा निर्धार मेळावा दणक्यात
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक खंबीरपणे पाठीशी उभा आहे तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. राजकारणातून निवृत्त झालेले ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेच्या मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि युवासैनिकांची मेहनत यातून पुन्हा महाराष्ट्र उभारण्याचे काम हाती घेऊ, तरूणांची फौज पाठीशी आहे. युवासैनिक कामाला लागले आहे, युवासेनेचे काम अतिशय शिस्तबद्ध सुरू आहे ४० गद्दार गेले, समोर बसलेल्या निष्ठावंतांच्या जीवावर १४० निवडून आणू असा निर्धार युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
बीड जिल्हा दौ-यावर असलेले युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवासेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी आमदार सुनील धांडे, युवासेनेचे विस्तारक परिक्षीत पाटील, विपुल पिंगळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्या रात्री असे काही घडले, संपूर्ण महाराष्ट्र हादरला, संध्याकाळी ४० आमदार सोडून गेले, खासदार गेले यांच्याशी लागेबांधे असणारे इतरही निघून गेले. निघून गेलेल्या गद्दारांना असे वाटले आता शिवसेना संपली, एकटे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, मात्र या गद्दारांना हे माहित नाही.
आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेला सुरूवात केली. पैठणच्या या निष्ठा यात्रेला लाखो शिवसैनिकांनी हजेरी लावली आणि त्याच पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सभेला माणसं भाड्याने आणावी लागली हे उभ्या महाराष्ट्राने बघीतले. निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा होतील, निवडणुकीतील खरे चित्र स्पष्टही होईल, सामान्य जनता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, युवासेनेचे जिल्हाधिकारी सागर बहीर, शुभम डाके, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, समन्वयक बप्पासाहेब घुगे, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, हनुमान पिंगळे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, तालुकाप्रमुख गोरख सिंगण, गणेश मस्के, शहरप्रमुख सुनील सुरवसे, किशोर जगताप, अरूण डाके यांच्यासह शिवसैनिक आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.